Moral stories in Marathi | Bodh Katha Marathi | Stories with moral in Marathi
गरुड आणि घुबड | Eagle and Owl moral story in Marathi
![]() |
| Eagle and Owl moral story in Marathi |
एक गरुड आणि एक घुबड, फार दिवस एकमेकांशी भांडत असत. शेवटी त्यांनी परस्परांशी मित्रत्वाने वागण्याची शपथ घेतली व एकमेकांच्या पिल्लांस खाऊ नये असे ठरविले.
घुबड गरुडास म्हणाले, ‘गडया ! पण माझी पिल्ले कशी असतात, हे तुला ठाऊक आहे ना? ठाऊक नसेल, तर ती दुसऱ्या एखादया पक्ष्याची आहेत असे समजून तू त्यांना गट्ट करशील, अशी मला भीति वाटते,’ गरुड म्हणाला, ‘खरेच, तुझी पिल्ले कशी असतात, हे मला मुळीच ठाऊक नाही.’
घुबड म्हणाले, ‘ऐक तर. माझी पिल्ले फार सुंदर असतात. त्यांचे डोळे सुंदर, पिसे सुंदर, सगळेच काही सुंदर असते. या वर्णनावरून माझी पिल्ले कोणती हे तुला सहज समजेल.’ पुढे एके दिवशी, एका झाडाच्या ढोलीत, गरुडास घुबडाची पिल्ले सापडली. त्यांजकडे पाहून तो म्हणाला, ‘किती घाणेरडी, कंडाळवाणी आणि कुरूप पिल्ले ही ! आपली पिल्ले फार सुंदर असतात, म्हणून घुबडाने सांगितले आहे. तेव्हा, ही घुबडाची पिल्ले खास नव्हते. यास मारून खाण्यास काही हरकत नाही.’ असे म्हणून त्याने त्या पिलांचा फडशा उडविला!
आपली पिल्ले नाहीशी झालेली पाहून घुबड गरुडाला म्हणाले, ‘गडया ! माझी पिल्ले तूच मारून खाल्लीस, असे मला वाटते.’ गरुड म्हणाला, ‘मी खाल्ली खरी, पण तो माझा दोष नव्हे.
तू आपल्या पिल्लाचे जे खोटेचे वर्णन केलेस, त्यामुळे ती मला ओळखिता आली नाहीत. इतकी कुरूप पिल्ले घुबडाची नसतील, दुसऱ्या एखादया पक्ष्याची असतील, असे समजून मी ती मारून खाल्ली, यात माझा काय अपराध आहे बरे?’
तात्पर्य – स्वतःसंबंधाची खरी हकीकत लपवून ठेवून, भलतीच हकीकत सांगणारा मनुष्य शेवटी आपणास ो.
मूर्ख डोमकावळा | Murkh Domkavala Marathi Katha
एका गरूडाने कुरणात चरत असलेल्या मेंढ्यांच्या कळपातील एका कोकरावर झडप घातली व त्या कोकराला पळवून नेले. त्याचे हे धाडस आणि सामर्थ्य पाहून रानातले सर्व पशुपक्षी त्या गरूडाकडे भीतीयुक्त आदराने पाहू लागले.
‘गरूडाने पळवले त्यापेक्षाही मोठे कोकरू जर आपण पळवले तर गरूडापेक्षाही आपला मानसन्मान वाढेल, त्याच्याइतकीच प्रतिष्ठा आपल्याला लाभेल असे एका डोमकावळ्याला वाटले.
त्यासाठी त्याने नजर ठेवून एका मोठ्या थोराड अशा कोकराच्या पाठीवर बसून त्याला उचलण्याचा प्रयत्न केला पण ते कोकरू उचलले जाण्याऐवजी, डोमकावळ्याचेच पाय कोकराच्या पाठीवरील लोकरीमध्ये अडकले व तिथून सुटण्यासाठी त्याने पंखांची केलेली फडफड व आरडाओरड मेंढपाळाच्या कानी गेली.
तो तिथे आला व त्याने डोमकावळ्याला सोडविले व पिंज-यात कैद केले व त्याला स्वत:च्या मुलांच्या स्वाधीन केले. मुलांनी मेंढपाळाला विचारले,”बाबा या पक्ष्याचे नाव काय हो” यावर तो मेंढपाळ हसून म्हणाला,” या मूर्ख पक्ष्याला जर तुम्ही याचे नाव विचारले तर हा स्वत:ला गरूडापेक्षाही श्रेष्ठ असा पक्षी म्हणून स्वत:ची ओळख करून देईल पण प्रत्यक्षात हा मोठेपणाचा आव आणणारा एक भिकार डोमकावळा आहे.”
तात्पर्य: काही काही लोकांना मोठेपणाचा आव आणण्याची प्रचंड सवय असते. यामध्ये त्यांनी कितीही जरी मोठेपणाचे सोंग घेतले तरी इतर सूज्ञ लोक हे त्यांची पात्रता जाणून असतात.
उंदीर, कोंबडा आणि मांजर | Undir, Kombada aani Manjar Marathi Katha
![]() |
Undir, Kombada aani Manjar Marathi Katha |
एक उंदराचे पिटुकले पिल्लु पाहिल्यांदा आपल्या बिळातून बाहेर पडले होते, ते थोडा वेळ इकडेतिकडे फिरून पुनः बिळात गेल्यावर आपल्या आईस म्हणते, ‘आई, ज्या या लहानशा जागेत तू मला लहानाचे मोठे केलेस, ती जागा सोडून आज मी अंमळ बाहेर जाऊन आले; तेथे मी जी मौज पाहिली, ती काही विलक्षणच.
रस्त्याच्या बाजूने फिरत असता, मी दोन प्राणी पाहिले; त्यापैकी एक प्राणी फार गडबडया स्वरूपाचा असून त्याच्या डोक्यावर तांबडया रंगाचा तुरा होता.
तो प्राणी जेव्हा जेव्हा आपली मान हलवी, तेव्हा तेव्हा तो तुराही हालत असे. मी त्याची ही मौज पहात होतो, इतक्यात त्याने आपले दोन्ही हात हलविले आणि असा काही कर्कश शब्द केला की, त्याने माझ्या कानठळ्याच बसून गेल्या.
आता दुसर्या प्राण्याची गोष्ट ऐक. तो प्राणी फार सभ्य आणि शांत असून, त्याच्या अंगावर रेशमासारखी मऊ लोकर होती. तो चांगला देखणा असून, त्याचे एकंदर वर्तन असे होते की त्याच्याशी आपली मैत्री व्हावी असे मला वाटल्याशिवाय राहिले नाही.
हे भाषण ऐकून उंदरी त्यास म्हणाली, ‘वेडया पोरा ! तुला काडीचीही अक्कल नाही. नुसत्या दिखाऊपणावर जाशील तर फसशील, हे लक्षात ठेव. तू जो प्राणी पाहिल्याने पाहिलास व ज्याचा शब्द ऐकून तुला इतके भय वाटले, तो विचारा कोंबडा अगदी निरुद्रची असून, एखादे वेळी त्याच्या मांसाचा थोड तरी भाग आपणास मिळण्याचा संभव आहे; पण रेशमासारख्या मऊ अंगाचा जो दुसरा प्राणी तू पाहिलास ते दुष्ट लबाड आणि क्रूर मांजर असून, उंदराच्या मांसाशिवाय दुसरा कोणताही पदार्थ त्याला फारसा आवडत नाही, हे लक्षात ठेव.’
तात्पर्य: बाह्य देखावा आणि सौंदर्य यांवरून माणसाच्या अंतरंगाची परीक्षा होणे शक्य नाही.
सवय | Savay Marathi Katha
![]() |
| Savay Marathi Katha |
एका माणसाने त्याच्या घरी एक पोपट पाळला होता. पिंज-यात ठेवलेल्या पोपटाला चांगले खायलाप्यायला मिळत असे व पोपट बोलका असल्याने घरातील लोकांकडून त्याचे फार कौतुकही केले जाई. पण पोपटाच्या मनात मात्र पारतंत्र्याचे शल्य दाटून येई.
अखेर एकेदिवशी पोपटाला संधी चालून आली. त्या माणसाने पोपटाला खाणे देण्यासाठी पिंज-याचे दार उघडले होते व त्याच्याहातून ते तसेच उघडे राहिले होते. माणसाला अचानक काही काम आल्याने तो ते दार उघडे टाकून निघून गेला असता पोपट पिंज-याच्या बाहेर निघून गेला.
पण लहानपणापासूनच पिंज-यात राहिला असल्याने त्याला फारसे नीट उडताच येत नव्हते. एका झाडावर गेला असता त्याला इतर पोपटांशी बोलता येईना कारण लहानपणापासूनच तो परकी भाषा शिकत असल्याने त्याला पोपटांची भाषा येत नव्हती म्हणून इतर पोपटही त्याला सहकारी मानत नव्हते.
पिंज-यात आयते खायची सवय असल्याने त्याला अन्न मिळवणे अवघड जाऊ लागले व ऊन वारा पाऊस यांची कधीच सवय नसल्याने तो आजारी पडला व मरून गेला.
तात्पर्य: जास्त काळ पारतंत्र्यात(गुलामगिरीत) राहिल्याने तशीच गुलामगिरीची सवय अंगात मुरुन राहते. मग परक्याची भाषा, संस्कृतीच आपली वाटू लागते आणि मिळालेले स्वातंत्र्य टिकवण्यासाठीची जिद्द अंगी राहत नाही. परक्या संस्कृतीचे चांगले काही घेताना आपल्या संस्कृतीचे विस्मरण होऊ न देणे हाच खरा शहाणपणा.
मोहामुळे भिकारी ठरला दुर्दैवी | Mohamule Bhikari Tharla Durdevi
![]() |
| Mohamule Bhikari Tharla Durdevi |
एक भिकारी दिवसभर पुष्कळ नामजप करायचा. देवाला त्याची दया आली. एक दिवस देव प्रगट झाला आणि त्याने भिका-याला ‘काय हवे ते माग’, असे सांगितले.
भिका-याने सोन्याच्या मोहरा मागितल्या. देव म्हणाला, ‘‘मोहरा कशात घेणार ?’’ भिका-याने झोळी पुढे केली. मोहरा ओतण्यापूर्वी देव म्हणाला, ‘‘तू ‘पुरे’म्हणेपर्यंत मी मोहरा ओतत राहीन; पण एक अट – मोहरा झोळीतून भूमीवर पडता कामा नयेत. भूमीवर पडलेल्या मोहरेची माती होईल.’’
भिका-याने अट मान्य केली. देव भिका-याच्या झोळीत मोहरा ओतू लागला. हळूहळू झोळी भरत आली. भिका-याला सोन्याचा मोह आवरेनासा झाला. मोह-यांच्या भाराने आता झोळी फाटू शकते, हे लक्षात येऊनही भिकारी ‘पुरे’ म्हणेना. शेवटी व्हायचे तेच झाले.
झोळी फाटली आणि सर्व मोहरा मातीमोल झाल्या !समाधानी वृत्ती नसलेला भिकारी दुर्दैवी ठरला.
सिंह आणि लांडगा | Sinh aani Landaga Marathi Katha
![]() |
| Sinh aani Landaga Marathi Katha |
एक सिंह आणि लांडगा असे दोघे वनातून फिरत असताना त्यांच्या कानी काही मेंढ़यांचा आवाज आला. तो आवाज ऐकून मोठ्या बढाईने लांडगा सिंहाला म्हणाला,” महाराज, तुम्ही आता चालून चालून दमला असाल, तेव्हा तुम्ही इथेच बसा.
मी तुमच्यासाठी दोन-चार मेंढ्या मारून आणतो. याप्रमाणे बोलून लांडगा मेंढ्यांच्या आवाजाच्या रोखाने गेला असता त्याला त्या मेंढ्यांच्या कळपाजवळ मेंढ्यांचा धष्टपुष्ट मालक आणि चार शिकारी कुत्रे असल्याचे दिसले.
त्याबरोबर तो लांडगा परतपावली सिंहाकडे आला व सिंहाला म्हणाला,” महाराज तुम्ही तर या जंगलाचे राजे आहात आणि तिकडे उभ्या असलेल्या मेंढ्या रोगट आणि अशक्त आहेत.
इतक्या सा-या मेंढयामध्ये एकही मेंढी चांगली नाही तेव्हा आपण दुसरी कोणती तरी शिकार करणेच बरे होईल.” सिंहानेही शिकारी कुत्र्यांचा आवाज ऐकला होता त्यामुळे सिंहाला लांडग्याचा धूर्तपणा लक्षात आला.
तात्पर्य: आपली असहाय्यता लपविण्यासाठी काही ना काही सबबी पुढे करणे हा प्राणीमात्रांचा स्वभाव आहे.
मनःशांती | Man Shanti Marathi Katha
![]() |
| Man Shanti Marathi Katha |
एकदा भगवान विष्णूंनी ठरविले की, आज जो जे मागेल ते त्याला द्यायचे. सर्वांच्या इच्छा पूर्ण करावयाच्या. सर्व याचक एका ओळीत उभे राहून आपली पाळी आली की आपल्याला हवे ते मागून घेत होते. कोणी धन, कोणी संतान, कोणी स्वास्थ्य तर कोणी वैभव मागत होते.
विष्णू दोन्ही हातांनी भरभरून देत होते. लक्ष्मीने पाहिले की, हळूहळू विष्णूचे भांडार रिकामे होत चालले आहे. तेव्हा विष्णूचा हात धरत ती म्हणाली, अशा रीतीने देत राहिलात तर वैकुंठाचे सर्व वैभव काही क्षणातच नाहीसे होईल. मग आपण काय करायचे?
सस्मित चेहर्याने विष्णूंनी उत्तर दिले, ‘तू अजिबात चिंता करू नकोस. मजजवळ अजून एक संपत्ती सुरक्षित आहे. ती मानव, गंधर्व, किन्नर या पैकी कोणीच अजून मागितलेली नाही. ती संपत्ती जोपर्यंत आपल्याजवळ आहे तोपर्यंत तू दुसरे काहीही द्यावे लागले तरी काळजी करू नकोस.’
लक्ष्मीने विचारले, ‘सांगा बघू अशी कोणती अजब गोष्ट आपल्याजवळ आहे. माझ्या तर काही लक्षात येत नाही.’ विष्णू म्हणाले, ‘तिचं नाव आहे शांती’ जर मनःशांती नसेल तर विश्वातील सारी संपत्ती जरी माणसाला प्राप्त झाली तरी ती आपत्तीच ठरते. म्हणून मी शांती सांभाळून ठेवली आहे.
अती तेथे माती | Ati Tethe Mati Marathi Katha
![]() |
| Ati Tethe Mati Marathi Katha |
एक भिकारी होता. तो रोज गावात लोकांना भीक मागायचा. मिळेल ते खायचा. काही मिळाले नाही, तर पाणी पिऊन जगायचा. त्याला या जीवनाचा कंटाळा आला होता. त्याला कोणीतरी सांगितले की ‘तू गावाबाहेर नदीकाठी इंद्राची पूजा कर. तो प्रसन्न होईल आणि तुला श्रीमंत करेल’. तो त्याप्रमाणे करतो. इंद्र प्रसन्न होतो.
इंद्र त्याला म्हणतो, की ‘तू तुझी झोळी पुढे कर. मी त्यात पैसे टाकत जाईत. तू जेव्हा थांब म्हणशील, तेव्हा मी थांबेन. मात्र, हे लक्षात ठेव, जर तुझी झोळी फाटली व पैसे खाली पडले तर त्यांची माती होईल. तो भिकारी आपल्या झोळीत मावेल एवढेच पैसे घेतो व त्याला थांब म्हणतो. तेवढ्या पैशांवर तो आनंदीत होतो. त्यानंतर तो गावात येतो. चांगले कपडे घेतो, घर बांधतो.
त्याला एक जण विचारतो की तू एकदम कसा श्रीमंत झालास ? तेव्हा तो त्याला सगळी हकीकत सांगतो. त्या माणसालाही पैशांची हाव सुटते. तो सुध्दा गावाबाहेर जातो. इंद्राला प्रसन्न करतो. इंद्र त्याच्या झोळीत पैसे टाकायला सुरवात करतो. तो आणखी मागत राहतो. शेवटी पैशाच्या हव्यासापायी थांब म्हणायचे विसरतो. त्यामुळे त्याच्या झोळीवर त्या पैशांचा ताण पडतो आणि ती फाटते. सर्व पैसे खाली पडतात व त्यांची माती होते. त्याचबरोबर इंद्रही नाहीसा होतो. त्याच्यापाशी रडण्याशिवाय काहीच उरत नाही.
तात्पर्य: कोणत्याही गोष्टीचा लोभ नसावा.
खोड मोडली | Khod Modali Marathi Katha
![]() |
| Khod Modali Marathi Katha |
त्यातील मीठ विरघळल्याने ते हलके झाले. त्यामुळे गाढवाचे ओझे कमी झाले. त्याला चांगलाच आराम मिळाला. दुसर्या दिवशी गाढवाने मुद्दाम पाण्यात पडल्याचे नाटक केले. मीठ पुन्हा पाण्यात भिजल्याने त्यादिवशीही गाढवाला आराम मिळाला. मग तो सारखेच असे करू लागला. पण लवकरच तुकारामला ही युक्ती लक्षात आली. त्याची खोड मोडण्यासाठी मग त्याने एके दिवशी त्याच्या पाठीवर कापसाचे ओझे ठेवले.
ओढा लागताच गाढवाने पुन्हा पडल्याचे नाटक केले. मात्र, या वेळी पाटीवर मीठाऐवजी कापूस असल्याने तो भिजल्यावर चांगलाच जड झाला. त्यामुळे गाढवाला लवकर उठता येईना. त्याला त्या दिवशी अधिकच ओझे वाहावे लागले. त्याला चांगलीच अद्दल घडली. तेव्हापासून गाढवाने कधीच पाण्यात पडल्याचे नाटक केले नाही व कामचुकारपणा केला नाही.
तात्पर्य: कामातून पळवाट शोधणे केव्हाही वाईट.
मूर्खांचे निष्कर्ष | Murkhanche Nishkarsha Marathi Katha
![]() |
| Murkhanche Nishkarsha Marathi Katha |
एका खगोलशास्त्रज्ञाने दुर्बिणीतून सूर्याचे निरीक्षण केले. त्याला निरीक्षणातून असे कळून आले की सूर्यावर प्रचंड मोठा प्राणी आहे व आपण खूप मोठा शोध लावला या समजूतीने तो लोकांना जमवून त्या शोधाची माहिती सांगू लागला की ” सूर्य प्रचंड उष्ण तारा असूनही त्यावर एक प्राणी जीवंत राहतो आणि तुम्ही सगळे आता घाबरून राहा जर तो प्राणी पृथ्वीवर आला तर पृथ्वीचे काय होईल हे पहा.” खगोलशास्त्रज्ञाच्या या बोलण्यावर काही लोकांचा खरेच विश्वास बसला व त्यांच्यापैकी काही लोकांनी त्याचा सत्कार करण्याचे ठरविले.
पण जमलेल्या काही लोकांपैकी एक जण चिकित्सक होता त्याने त्या ज्योतिष्याची दुर्बिण तपासायचे ठरविले व त्याने ती दुर्बिण तपासली असता त्याच्या लक्षात आले की महाकाय प्राणी हा सूर्यावर नसून एक माशी दुर्बिणीच्या काचेवर अडकून पडली आहे आणि सूर्याकडे पाहताना ती माशी म्हणजे महाकाय प्राणी असल्याचा भास होत होता. चिकित्सक माणसाने ही गोष्ट लोकांना सांगताच त्यांना शास्त्रज्ञाचा मूर्खपणा लक्षात आला.
तात्पर्य: जे लोक मूर्खपणाने किंवा उतावीळपणे बेछूट विधाने करतात किंवा सारासार विचार न करता, पुढचामागचा विचार न करता बोलत राहतात असे लोक कधी ना कधी तोंडावर आपटतात. त्यांचा पराभव हा निश्चित ठरलेला असतो.
सेवा हाच धर्म | Seva hach Dharma Marathi Katha
![]() |
| Seva hach Dharma Marathi Katha |
एका पत्रकारांनी स्वामी विवेकानंदांची कीर्ती ऐकलेली होती. स्वामी विवेकानंदांना भेटून त्यांच्याकडून चार ज्ञानाच्या गोष्टी शिकाव्यात अशी त्यांची तीव्र इच्छा होती.
त्या पत्रकारांचे दोन मित्र त्यांना भेटावयास आले व बोलता-बोलता स्वामी विवेकानंदांचा उल्लेख निघाला. तिघांनी विवेकानंदांना भेटायला जाण्याचे ठरविले. तिघेही मिळून स्वामीजींकडे गेले. विवेकानंदांनी तिघांचीही आस्थेने विचारपूस केली.
यादरम्यान स्वामीजींना असे कळाले की तिघेही पंजाब प्रांतात राहणारे आहेत. त्या काळात पंजाबात दुष्काळ पडलेला होता. त्यांनी त्यासंदर्भात चर्चा केली. दुष्काळग्रस्तांसाठी चाललेल्या मदतकार्याची माहिती घेतली. त्यानंतर शैक्षणिक, नैतिक आणि सामाजिक बाबींवर चर्चा केली. ब-याच वेळ चर्चा झाल्यानंतर तिघेही निघाले.
निघताना पत्रकार महाशय विवेकानंदांना म्हणाले,”स्वामीजी, आम्ही तुमच्याकडे धार्मिक उपदेश मिळेल या उद्देशाने आले होतो. पण तुम्ही मात्र सामान्य अशा बाबींवरच चर्चा केलीत. आम्हाला यातून ज्ञानवर्धक असे काहीच मिळाले नाही.” या स्वामी विवेकानंदांनी मोठे मार्मिक उत्तर दिले ते असे की,” मित्रवर्य, जोपर्यत या देशात एक जरी मूल उपाशी राहिले तर धर्माची चर्चा करण्यापेक्षा त्याची भूक कशी भागवता येईल हे पाहणे जास्त महत्वाचे आहे. ज्याचे पोट भरलेले नाही त्याला धर्मोपदेश देण्यापेक्षा भाकरी देणे हे महत्वाचे आहे. रिकाम्या पोटी तत्वज्ञानाचा उपदेश उपयोगी नाही.
राजज्योतिषी | Rajjyotishi Marathi Katha
![]() |
| Rajjyotishi Marathi Katha |
अवंतीनगरीचे राजा बाहुबली यांना राजज्योतिष्याची गरज होती. मंत्रिपरिषदेसमोर त्यांनी ही इच्छा व्यक्त केली. राजज्योतिषाबाबत घोषणा केली जावी आणि पात्र व्यक्तिला निरखुन पारखून नियुक्त केले जावे अशी सर्व मंत्रिगणांनी सर्वसहमतीने ठरवले.
या पदासाठी पात्र उमेदवारांनी मुलाखती द्याव्यात अशी दवंडी दुस-या दिवशी राज्यात पिटवण्यात आली. सर्व उमेदवार ठरलेल्या वेळी दरबारात उपस्थित झाले. राजाने स्वत:च मुलाखती घेण्यास सुरुवात केली. अनेक ज्योतिष्यांनी आपल्या ज्ञानाचे सादरीकरण करण्यास सुरुवात केली परंतु राजाचे समाधान झाले नाही.
अखेरीस तीन ज्योतिषी उरले त्यातील पहिल्या ज्योतिष्याला राजाने विचारले,”तुम्ही भविष्य कसे सांगता” ज्योतिषी म्हणाला,”नक्षत्र पाहून” राजाने दुस-या ज्योतिष्याला हाच प्रश्न विचारला तेव्हा दुसरा ज्योतिषी म्हणाला,”हस्तरेषा पाहून भविष्य सांगतो” राजाला कुणाचीच उत्तरे आवडली नाहीत.
अचानक राजाला तेव्हा आपल्या राज्यातील निर्धन ज्योतिषी विष्णुशर्माची आठवण झाली. विष्णुशर्माला तात्काळ बोलावण्यात आले. राजाने विष्णुशर्माला विचारले,” तुम्ही ज्योतिषी असूनसुद्धा या मुलाखतीसाठी का आला नाहीत. तुम्हाला राजज्योतिषी होणे आवडत नाही काय” विष्णुशर्माने सांगितले,”महाराज मी घरी बसून माझ्या स्वत:च्या पत्रिकेचा अभ्यास केला व माझ्या अभ्यासानुसार या पदावर मीच नियुक्त होणार आहे. तुम्ही मला निमंत्रण पाठवून मला बोलावून घ्याल हे मला माझ्या अभ्यासातून आधीच कळाले होते. त्यामुळे मी या पदासाठी मुलाखत देण्यास आलो नाही.” राजाला विष्णुशर्माची अभ्यासू वृत्ती व त्याचा आत्मविश्वास या दोन्हीचा अभिमान वाटून त्याने विष्णुशर्माला राजज्योतिषी म्हणून नियुक्त केले.
तात्पर्य: ज्यांचा स्वत:वर व स्वत:च्या अभ्यासावर प्रचंड विश्वास असतो ते कधीच हार मानत नाहीत व त्यांच्याकडे संधी आपोआप चालून येते.
विजय असो | Vijay Aso Marathi moral story
![]() |
| Vijay Aso Marathi moral story |
एकदा एका गावात दोन कोंबड्यांची झुंज सुरु झाली. भांडणाचे कारणही तसे भारीच होते, एका कोंबडीशी कुणी लग्न करायचे यावरून त्या दोघांत खूप भांडणे झाली व त्याचे पर्यवसान झुंजीत झाले. अटीतटीच्या झुंजीत दोघेही एकमेकांवर प्रहार करू लागले.
मारामारीत दोघांचेही अंग रक्तबंबाळ झाले, त्यातील एकाने मग रक्तबंबाळ झाल्याने सरळ पळून जाऊन आपल्या खुराड्याचा आधार घेतला व तिथूनच तो आणि ती कोंबडी बाहेर काय चालले आहे हे पाहू लागले.
भांडणात खुराड्याच्या बाहेर असलेल्या कोंबड्याला हा आपला विजय वाटून त्याने घराचे छत गाठले व तिथून जोरजोराने त्या कोंबडीकडे बघून ”मी जिंकलो, मी जिंकलो” असे ओरडू लागला, स्वत:चाच जयघोष करू लागला.
तेवढ्या वरून एक गरूड आला व त्याने त्या ओरडणा-या कोंबड्याला उचलले व लांब जाऊन त्याने त्याला मारून खाऊन टाकले. हे पाहिल्यावर पराभूत झालेला कोंबडा व कोंबडी बाहेर आले तेव्हा तो कोंबडा कोंबडीला म्हणाला,”मी जर बाहेर राहिलो असतो तर त्या कोंबड्यासारखीच माझी हालत झाली असती. मी माझ्या जीवाला जसा जपतो तसाच तुलाही जपेन.”
तात्पर्य: ज्याच्या डोक्यात यशाची हवा चढते तेव्हाच त्याच्या पराजयाची सुरुवात होते. यश पचविता येणे ही एक मोठी गोष्ट आहे.
धनाचा विनियोग | Dhanacha Vinyog Marathi bodhkatha
![]() |
| Dhanacha Vinyog Marathi bodhkatha |
कोल्ह्याने नागाला विचारले,”हे नागदेवता, तुम्ही इथे काय करता आहात.” नाग म्हणाला,” माझ्या पूर्वजांनी पुरून ठेवलेल्या धनाचे मी रक्षण करत आहे.” मग कोल्हा पुन्हा म्हणाला,” पण इथं इतकं मोठं धन असताना तुम्ही कधी त्याचा उपभोग घेतला आहे किंवा नाही.
उपभोग सोडा थोडंफार धन दानापोटी तरी खर्च केलंत काय” नाग म्हणाला,” कसं शक्य आहे, हे धन कमी होऊ नये म्हणून तर मी स्वत: या धनाचे रात्रंदिवस डोळ्यात तेल घालून रक्षण करत आहे. त्याचा उपभोग घेणे किंवा दुस-याला दान देणे ह्यापेक्षा या धनाचे रक्षण करण्यातच मला जास्त आनंद आहे.”
हे ऐकून कोल्हा नागाला म्हणाला,” मग नागदेवा, तुमच्या असल्या या श्रीमंतीपेक्षा मी गरीब आहे तोच बरा. ज्या धनाचा उपभोग घेतला जात नाही व ज्यातून दान केले जात नाही अशा धनाचा काय उपयोग”
तात्पर्य – ज्या धनाचा योग्य विनियोग न होता केवळ संचय केला जातो त्या धनाचा मनुष्यमात्राला काहीच फायदा नाही.
लाडूची चोरी | Laduchi Chori Marathi Katha
![]() |
| Laduchi Chori Marathi Katha |
यावर प्रत्यक्षात लाडू चोरणारा तरूण म्हणाला,”देवाशप्पथ, मी खरं सांगतो की लाडू माझ्याकडे नाही.” ज्याच्या खिशात तो लाडू होता, तो तरूण म्हणाला,” देवाशप्पथ खरंच सांगतो मी लाडू मुळी चोरलेला नाही.” दुकानदाराला खरे काय ते माहित असूनही केवळ यांच्या भाषिक कसरतीमुळे त्यांची चोरी सिद्ध करू शकला नाही.
तात्पर्य: भाषेच्या कसरतीमुळे एखादा इसम निरपराधी असल्याचे सिद्ध करता आले नाही तरी प्रत्यक्षात तो अपराधी असू शकतो.
परोपकार | Paropkar Marathi Moral Story
त्यानंतर अजून एक अपंग व्यक्ती दाराशी आली त्यानेही या गरीबाकडे अन्न मागितले त्यालाही याने आपल्या थाळीतील अन्न खायला दिले. आता याच्याकडे देण्यासारखे काहीच शिल्लक राहिले नाही तेव्हा याने स्वत:ची भूक भागविण्यासाठी एक भांडेभर पाणी घेतले तर समोरून एक वृद्ध व्यक्ती आली व तिने ते पाणी पिण्यासाठी मागितले. याला आता खाण्यापिण्यासारखे काहीच उरले नाही तरीही ही व्यक्ती समाधानात होती आजचा दिवस आपल्यामुळे किमान चार लोकांना तरी खाण्यापिण्यास मिळाले. तो ह्याच विचारात असताना तेथे देव प्रगटले व म्हणाले,’मी तुझी परीक्षा घेण्यासाठीच भिकारी, भिक्षुक, अपंग आणि वृद्ध व्यक्तिचे रूप घेतले होते व तुझ्याकडून काही ना काही मिळते का नाही हे पाहिले आणि तु स्वत:चा विचार न करता दुस-याचा जीव जाणून घेतलास व देत राहिलास. आता या पुढे तुला काहीच कमी पडणार नाही असा मी तुला वर देतो.” इतके बोलून देव अंतर्धान पावले.
तात्पर्य: देण्यातच खरे सुख लपलेले आहे. कुणाचाही घास हिरावून घेण्यापेक्षा कुणाला तरी एखादा घास देता कसा येईल याचा विचार करणे यातच खरे सुख लपलेले आहे.
स्वप्न | Swapn Marathi Katha
![]() |
Swapn Marathi Katha |
आपण सामान्य माणसेही असेच कल्पनांचे, मनोरथांचे विमान पळविण्याच्या आहारी गेलो आहोत. परंतु त्या खोलीत जसे वेडे दिसत नव्हते, तसाच स्वतःचा वेडेपणाही आपल्याला दिसत नाही.
लोभी राजा | Lobhi Raja Marathi Katha
![]() |
| Lobhi Raja Marathi Katha |
एके दिवशी त्याच्या दरबारात एक थोर तपस्वी येतो. राजा दोन दिवस त्यांची मनोभावे सेवा करतो. ते पाहून तो तपस्वी खूश होतो व त्याला म्हणतो, ’राजा, तू माझी जी सेवा केली त्याने मी प्रसन्न झालो आहे. तू पाहिजे तो वर माग’. तो लोभी राजा म्हणातो, ‘मला असा वर द्या की मी ज्या वस्तूला हात लावेन ती सोन्याची होईल.’ तपस्वी म्हणतो, ‘नीट विचार कर. नंतर पश्चाताप करशील.’
राजा आपल्या मागणीवर ठाम असतो. तपस्वी तथास्तू म्हणतो. राजा लगेच शेजारच्या सिंहासनाला हात लावतो. ते सोन्याचे होते. तो खूष होतो. मग तो पुढे ज्या वस्तूंना हात लावतो, त्या सोन्याच्या व्हायला लागतात. थोड्यावेळाने त्याला भूक लागते. म्हणन तो फलाहार करायला जातो, पण ती फळेही सोन्याची होतात.
त्याला काहीच खाता, पिता येत नाही. कारण ज्याला तो हात लावी ते सोन्याचे होई. निराश झालेला राजा आपल्या सिंहासनावर बसलेला असताना त्याची मुलगी बागेतून खेळून त्याच्याकडे येते. तो आनंदातने तिला घेण्यासाठी हात करतो, तर ती ती सोन्याची होऊन जाते. राजा अतिशय दु:खी होतो.
त्याला एकदम रडू कोसळते. त्याची लाडकी मुलगी त्याला मिळालेल्या वरामुळे सोन्याची मूर्ती होऊन बसली होती. त्याला आपली चुक कळते, पण आता फार उशीर झालेला असतो.
तात्पर्य: कोणत्याही गोष्टीचा अति लोभ वाईटच.
तहानलेला कावळा | Thirsty crow story in Marathi
![]() |
| Thirsty crow story in Marathi |
एकदा एका कावळ्याला फार तहान लागते. तो पाण्याचा खूप शोध घेतो. पण पाणी काही मिळत नाही. शेवटी त्याला एक भांडे सापडते. त्यात पाणी असते, पण त्याची पातळी खाली गेलेली असते. त्याला पाणी काही पिता येत नाही. मग त्याला एक कल्पना सुचते. तो त्या पाण्यात छोटे खडे टाकायला सुरवात करतो.
खडे पडू लागतात तशी पाण्याची पातळी वाढू लागते. असे करता करता पाणी त्याला पिता येईल एवढ्या पातळीपर्यंत आले. त्यानंतर कावळ्याने भरपूर पाणी प्यायले आणि तो निघून गेला.
तात्पर्य: प्रयत्ने वाळूचे कण रगडता तेलही गळे.
लाकूडतोड्या व देवदूत | Lakudtodya va Devdut Small story in Marathi
![]() |
| Lakudtodya va Devdut Small story in Marathi |
नदीकाठी असलेल्या एका झाडावर चढून एक लाकूडतोड्या लाकडे तोडत असतो. लाकडे तोडत असताना अचानक त्याची कुर्हाड नदीत पडते. नदी खोल असल्यामुळे त्याला नदीत जाऊन ती कुर्हाड काढता येत नव्हती. तो दुःखी होऊन रडू लागतो.
हे पाहून नदीतून एक देवदूत येतो. तो त्याला म्हणतो की, काळजी करू नकोस. मी तुला तुझी कुर्हाड काढून देतो. तो देवदूत नदीत डुबकी मारतो व सोन्याची कुर्हाड काढतो व म्हणतो ही का तुझी कुरहाड? लाकूडतोड्या म्हणतो, नाही ही माझी कुर्हाड नाही..
देवदूत पुन्हा नदीत डुबकी मारतो व चांदीची कुर्हाड काढतो व म्हणतो ही का तुझी कुर्हाड? लाकुडतोड्या म्हणतो नाही. मग तो देवदुत लोखंडाची कुर्हाड काढतो. लाकू़डतोड्या आता मात्र हीच माझी कुर्हाड असल्याचे सांगतो. कुर्हाड परत मिळाल्याने आनंदी होतो. लाकूडतोड्याचा प्रामाणिकपणा पाहून देवदूत लाकूडतोड्यावर प्रसन्न होतो. त्याला सोन्याची व चांदीची अशा दोन्ही कुर्हाडी बक्षीस म्हणून देतो.
घामाचा पैसा | Ghamacha Paisa Marathi Story
![]() |
| Ghamacha Paisa Marathi Story |
एका शेठजींचा मुलगा, अज्जू खूप आळशी होता. घरात गडगंज संपत्ती आणि एकुलता एक म्हणून लाडका. काम त्याला कधी करावे लागलेच नाही. असे करत करत तो एकवीस वर्षांचा झाला.
शेठजींना लागली काळजी. साठवलेला पैसा किती दिवस पुरणार? दुसर्याच दिवशी त्यांनी मुलाला बोलावले बाहेर पडायला सांगितले. पैसा कमवून आणलं तर जेवायला मिळेल ही अट ठेवली.
अज्जूला काहीच कळेना. त्याने बहिणीकडून एक रूपया मागितला. आणि दिला जाऊन शेठजींना. पण तो त्यांनी विहीरीत फेकला. दुसर्या दिवशी पुन्हा हीच अट ठेवली. आता अज्जू आईकडे गेला. तोही पैसा वडिलांनी फेकला. आता मात्र आला तिसरा दिवस. अज्जू दिवसभर काम शोधत फिरला. पण काम काही मिळेना. हताश होऊन गेला. काहीच सुचेना. पोटात लागले कावळे कोकलायला. शेवटी स्टेशनवर एक माणूस हमालाची वाट पहात असलेला दिसला.
हे पाहताक्षणीच अज्जू धावत सुटला आणि बॅग त्याने डोक्यावर उचलून त्याच्या घरी पोहचवली. एवढे करेपर्यंत घामाघुम झाला. पण त्या माणसाने अज्जूच्या हातावर टेकवले फक्त आठ आणे. शेठजींच्या हातावर आठ आणे ठेवताच त्यांनी ते विहिरीत फेकले. वडिलांच्या या कृतीने अज्जू संतापला. म्हणाला, बाबा तुम्हाला जाणीव नाही की ते आठ आणे मिळवायला मला किती वणवण करावी लागली. शेठजी हसत हसत म्हणाले, हेच मला हवे होते. आज तुला खर्या कष्टाची किंमत कळली.
तात्पर्य: स्वकष्टाची कमाई तीच खरी कमाई.
सशाची युक्ती | Sashachi Yukti Marathi Katha
![]() |
| Sashachi Yukti Marathi Katha |
म्हणून जंगलातले सर्व प्राणी भासुरकाकडे गेले. सर्व प्राण्यांनी भासुरकाला विनंती केली, ”महाराज आपली गरज फक्त एकाच प्राण्यापुरती असताना आपण दररोज आम्हां गरीब प्राण्यांचा का प्राण घेता? आजपासून तुम्ही इथेच बसा. आम्ही जंगलातल्या एकेका जनावराची पाळी भोजनासाठी लावतो. त्यामुळे आपली भूकही शमेल आणि विनाकारण होणारा संहारही थांबेल.”
भासुरक सिंहाला प्राण्यांचे बोलणे पटले. पण त्याबरोबरच त्याने सर्व प्राण्यांना इशारा दिला की, ”मला बसल्या जागी एक प्राणी खायला मिळाला तरमला दुसरं काही नको पण लक्षात ठेवा, एक दिवस जरी यात खंड पडला तरी सर्वांना ठार करीन.”
सर्व प्राण्यांनी भासुरकाचा इशारा लक्षात ठेवून एकेक प्राणी भासुरकाकडे पाठवण्यास सुरुवात केली. प्रथम प्रथम म्हातारे ,जगण्याला कंटाळलेले, दु:खी-कष्टी प्राणी पाठवले पण नंतर चांगले धष्टपुष्ट प्राणी बळी म्हणून जाऊ लागले. तेव्हा विचार करण्याची पाळी जंगलातल्या प्राण्यांवर आली.
त्याचवेळी एकदा एका सशावर पाळी आली. ससा भासुरकाकडे जात असताना विचार करत होता की, ”आपल्यातला एक प्राणी बळी जातो आहे त्यापेक्षा सिंहालाच ठार मारले तर… पण कसं शक्य आहे?” तेवढ्यात त्याला रस्त्यात एक विहिरीत सहज वाकून बघतो. तेव्हा त्याचे प्रतिबिंब विहिरीत दिसते. ते बघून त्याच्या डोक्यात कल्पना येते की सिंहाला ठार मारायला ही युक्ती वापरू. संध्याकाळी उशिरापर्यंत वेळ काढून मग सिंहाकडे ससा गेला.
रोजची भुकेची वेळ होऊन गेल्याने सिंह चांगलाच भुकेलेला होता. ससा आलेला बघताच भासुरक सिंह खवळतो, ”अरे ससुर्ड्या…होतास कुठे तू? एक तर माझ्या घासालाही तू पुरणार नाहीस त्यात उशिराने आलास… थांब आधी तुला खातोच मग जंगलातल्या सर्व प्राण्यांना खातो.”
ससा घाबरतो पण धीर करून बोलतो, ”महाराज, मला वेळ झाला त्याला मीच नव्हे तर जंगलातले इतर प्राणीही जबाबदार नाहीत.” तुला वेळ होण्याचं कारण काय? सिंह आणखीनच चवताळतो.
”महाराज, ठरल्याप्रमाणेच मी येत होतो. पण रस्त्यात एका गुहेतून एक सिंह माझ्यासमोर आला. मला धमकावीत विचारलं, ”कुठं चाललास? तेव्हा मी सांगितलं की आमचे भासुरक सिंह महाराजाकहे चाललोय!” तेव्हा मला म्हणाला, ”कोण कुठला भासुरक म्हणे महाराज. एख नंबरचा चोर, त्याला आण बोलावून नाहीतर जंगलातल्या सर्व प्राण्यांना मी ठार करीन. शेवटी मीच राजा आहे ह्या जंगलाचा!” सशाचे बोलणे ऐकताच भासुरक चवताळला, ”तो दरोडेखोर सिंह राहतो कुठ दाखव मला…आजच्या आज त्याला ठार मारून टाकतो.”
ससा उत्तरतो, ”पण महाराज त्याची गुहा अत्यंत अडचणीच्या जागी असून आपणास त्रास व्हायचा.” सिंह रागाने लाला होऊन उद्गारतो, ”तुला काय करायचंय… आताच्या आता त्याचा फडशा पाडतो बघ.” ससा सिंहाला घेऊन त्या विहिरीजवळ जातो. आत वाकून बघत सिंहाला सांगतो, ”तुम्हाला आल्याचं बघून लपलेला दिसतोय.”
तेव्हा भासुरक सिंह स्वत: विहिरीच्या तोंडातून वाकून बघतो. तेव्हा स्वत:चे प्रतिबिंब बघून भासुरक मोठी गर्जना करतो. त्या गर्जनेचा प्रतिध्वनी विहिरीतून आल्याने भासुरक चिडून विहिरीत उडी मारतो आणि पाण्यात बुडून मरतो. ताबडतोब ससा आपल्या सर्व प्राणिमित्रांना ही गोष्ट कळवतो आणि सर्व प्राणी खूष होतात.
तात्पर्य: शक्तिपेक्षा युक्तीच श्रेष्ठ ठरते.
उंटाचा अतिशहाणपणा | Untacha Atishahanpana Marathi Moral Katha
![]() |
| Untacha Atishahanpana Marathi Moral Katha |
एका गावातील सुताराने सुतारकाम येत नसल्याने उपजीविकेसाठी एक उंटिण खरेदी केली. नंतर त्या उंटिणीला एक पोर झालं. कौतुकाने सुताराने त्या पोराच्या गळ्यात घंटा बांधली. काही दिवसांनी उंटाचा व्यापार करण्यासाठी सुताराने आणखी उंट खरेदी केले. त्या व्यापारात सुताराचे बस्तान चांगले बसते. गळ्यात घंटा बांधलेला उंट सुताराचा लाडका असतो.
पण हा उंट बाहेर चरताना कळपाबरोबर न राहता रमत गमत एकटा फिरायचा. तेव्हा बाकीच्या उंटांना वाटे की हा जंगलात असा एकटा फिरतो तर एखाद्या दिवशी वाघ-सिंह त्याला पकडतील. पण त्या उंटाने त्याकडे दुर्लक्ष केले.
एके दिवशी सर्व उंट चरून घरी परतले तरी हा उंट जंगलातच रेंगाळत होता. त्याचवेळी एका सिंहाने त्याच्यावर पाळत ठेवली. त्याच्या गळ्यातील घंटेमुळे हा उंट लक्षात येई. त्या दिवशी काळोखात उंट वाट चुकला. पण सिंहाने घंटेच्या आवाजावरून अंदाज घेऊन त्याच्यावर हल्ला केला आणि त्याला खाऊन टाकले.
तात्पर्य: शहाणपणाच्या उपदेशाकडे दुर्लक्ष केले तर जीवावर संकट येऊ शकते.
दानाचे मोल | Danache Mol bodh katha Marathi
![]() |
| Danache Mol bodh katha marathi |
राज्यात ओला दुष्काळ पडला होता. राजा प्रतापरावांनी सार्या शेतकर्यांचा सारा माफ केल्याचे जाहीर केले. अन्नही मोफत दिले जाईल, अशी दवंडी दिली. त्यांना वाटले की, आता सगळे खूश होऊन जातील, आपली स्तुती करतील. ती स्तुती ऐकावी म्हणून धान्य घेण्यासाठी आलेल्या शेतकर्यांच्या रांगेत जाऊन ते उभे राहिले. त्यांच्या पाठीमागे दोन शेतकरी येऊन उभे राहिले. ते शेतकरी आपापसांत कुजबुजत होते. आपले महाराज शूर आहेत. दानशूरसुद्धा आहेत पण त्यांना व्यवहार समजत नाही.
दुसरा शेतकरी दबल्या आवाजात म्हणाला, का रे ? फुकटचं धान्य खाऊन वर मस्तीला आलास का ? राजांना नावं ठेवतोस ? पहिला शेतकरी म्हणाला, अगदी बरोबर बोललास. गेले महिनाभर मला काही काम न करता असं फुकटंच खाण्याची सवय लागली आहे. मस्ती आल्याशिवाय कशी राहील ? यापेक्षा महाराजांनी आपल्याकडून श्रमदानाची कामे करुन घ्यायला हवी होती. काम मगच दाम हे धोरण त्यांनी राबवायला हवं होतं. राजा प्रतापरावांनी हा सल्ला मानला. त्यामुळे दानाचा दुरुपयोग टळला.
ईश्वराचे अस्तित्व | Ishawache Astitva Stories in Marathi
![]() |
| Ishawache Astitva Stories in Marathi |
ईश्वराने सृष्टीची निर्मिती केली. मानव नावाचा अदभूत प्राणीही निर्माण केला. त्याला तयार करताना मात्र देवाला खूप त्रास झाला. मानवाच्या निर्मितीनंतर हा त्रास वाढू लागला तेव्हा ईश्वराने सार्या देवतांना बोलाविले व विचारले, माणसाला तयार करुन मी संकटात सापडलो आहे. मला चोवीस तास हाका ऐकून घ्याव्या लागतात. सारखं वाटतं की, माणूस सतत माझ्या दाराजवळ उभा राहून तक्रार करत आहे. त्यामुळे मला शांतपणे झोपही लागत नाही. मी काय करु ? कोठे लपू ? जेथे माणूस येणार नाही अशी जागा सांगा?
या प्रश्नानंतर ईश्वराला त्या सार्या देवतांनी अनेक जागा सुचविल्या. पण ईश्वराला वाटले काहीही करुन माणूस तेथे पोहचणारच. म्हणून त्याने त्या सर्व जागा नाकारल्या अखेर एक म्हातारा देव उठला ! त्याने ईश्वराला कानात काहीतरी सांगितले. ईश्वरालाही ते पटले. त्या वृद्ध देवाने सांगितले होते की, तू माणसाच्या आत हृदयात लपून बैस. ईश्वराने तसे केले आणि तो सुखी झाला.
नैतिकतेचा आदर्श | Naitikecha Aadarsh Marathi Katha
आयुर्वेदाचे प्रणेते महर्षी चरक औषधी वनस्पतींच्या शोधात आपल्या शिष्यासह रानावनांत, जंगलात च दर्या डोंगरावरुन हिंडत चालले होते. चालता चालता अचानक त्यांची दृष्टी समोर हिरव्यागार शेतात उगवलेल्या एका सुंदर फुलाकडे गेली. आजपर्यंत त्यांनी असे आगळेवेगळे अनुपमेय सुंदर फूल कधी पाहिलेच नव्हते. त्यांना फूल स्वतःजवळ हवेसे वाटू लागले. पण संस्कारामुळे मन तसे करण्यास धजावत नव्हते. मनात चलबिचल होत होती. त्यांची ही अवस्था शिष्याच्या लक्षात आली. शिष्य त्यामना विनम्रपणे म्हणाला, गुरुवर्य आपली आज्ञा झाली तर ते फूल मी आपल्या सेवेस अर्पण करु?
महर्षी चरक म्हणाले, वत्सा ! त्या फुलाची मला निश्चितच गरज आहे. पण या शेताच्या मालकाच्या परवानगीशिवाय ते घेणे म्हणजे चोरी करणे ठरेल. महर्षीच्या या उच्च आदर्शवाद व नैतिकतेपुढे शिष्यांनी मान खाली घातली.
ते पुढे म्हणाले, शिष्यांनो, नैतिक जीवन व राजाज्ञा यात कोणतेच साम्य नाही. जर त्याने आपल्या प्रजाजनांची संपत्ती स्वच्छंदपणे व मनमानी करुन स्वतःकरता वापरली तर नैतिकतेचा आदर्श तो काय राहणार ? यानंतर महर्षी आपल्या शिष्यांसह तेथून तीन मैल अंतरावरील त्या शेतकर्याच्या घरी पायी गेले व त्याची परवानगी घेऊनच त्यांनी ते फूल तोडले.
ससा आणि कासव | Sasa aani Kasav moral story in Marathi
![]() |
| Sasa aani Kasav moral story in Marathi |
एका रानात एक कासव आणि ससा राहत होते. ससा नेहमी कासवासमोर बढाया मारी. त्याच्यासमोर फुशारकी गाजावे. एकदा ससा असाच फुशारकी करीत कासवाला म्हणाला, माझ्या चपळतेपुढे तू फारच क्षुद्र आहेस. माझ्याबरोबर चालण्याची, पळण्याची बरोबरी कोणीच करणार नाही.
कासव म्हणाले, ससेभाऊ, तुझ्या चपळतेचा तुला एवढा गर्व असेल, तर चल माझ्याबरोबर धावण्याची पैज लाव. आपण दोघे एकाच वेळी निघून त्या डोंगरापर्यंत जाऊ. जर माझ्याआधी तू तिथे पोहोचलास, तर मी तुला बक्षीस देईल आणि जर मी आधी पोहोचलो, तर तू मला बक्षीस देशील. बोल आहे कबूल?
सस्याने कासवाची अट मान्य केली. मग दोघेही एकाच वेळी तिथून निघाले. थोड्याच अवधीत ससा बराच पुढे निघून गेला. कासव मात्र आपलया गतीने चालले होते.
कासव खूपच मागे राहिलेले बघून सस्याने विचार केला, कासव अजून बराच मागे आहे. आपणही धावून दमलो आहे. थोडावेळ या झाडाखाली विश्रांती घ्यावी आणि पुन्हा ताजेतवाने होऊन धावत सुटावे. म्हणजे कासवाच्या किती तरी आधी आपण डोंगरापर्यंत पोहोचू.
एखादे वेळी कासव थोडे पुढे जरी निघून गेला तरी त्याला गाठण्यास आपल्याला कष्ट पडणार नाहीत. चार उड्यातच आपण त्याच्या पुढे जाऊ, असा विचार करत ससा झाडाखाली सावलीत झोपी गेला. थोड्याच वेळात तो घोरू लागला.
कासव मंद गतीने चालत चालत सश्याच्या पुढे निघून गेले आणि थोड्याच वेळात ते डोंगराच्या पायथ्याशी पोहोचला. तरी ससा आपला झाडाच्या सावलीत झोपलेलाच होता. सश्याला जाग आली तेव्हा पाहतो तर कासव पायथ्याला पोहोचलेले दिसले, तेव्हा त्याला आपलीच लाज वाटली.
कोल्हा आणि द्राक्षे | Kolha aani Draksh Marathi Katha
![]() |
| Kolha aani Draksh Marathi Katha |
एकदा कोल्हा खाण्याच्या शोधात फिरत फिरत एका द्राक्षाच्या वेलाजवळ आला. वेलीला द्राक्षाचे घोस लोंबत होते. ती पिकलेली सुंदर द्राक्षे पाहून कोल्ह्याच्या तोंडाला पाणी सुटले. आणखी कुठे खायला मिळेल का, हे शोधण्यापेक्षा इथेच द्राक्षावर ताव मारावा असे त्याच्या मनात आले.
कोल्हा उद्या मारीत द्राक्षे खाण्याच्या प्रयत्न करू लागला. बराच प्रयत्न केला तरी द्राक्षे काही त्याच्या हाती लागेनात. उद्या मारून मारून त्याचे अंग दुखू लागले. तो बाजूला झाला आणि म्हणाला, नाही तरी मला नकोतच ती द्राक्षे! कच्ची, हिरवीगार आणि आंबट आहेत. ज्या कोणाला हवी असतील, त्यांच्यासाठी मी ती तशीच ठेवून जातो.
जीभ | Jheebh Marathi katha
![]() |
Jheebh Marathi katha |
रात्री ठरलेल्या वेळी पाहुणे जमल्यावर सर्वजण जेवावयास बसले. इसापने नुसत्या बोकडाच्या जीभांचे निरनिराळे पुष्कळ पदार्थ तयार केले होते. ते खाऊन पाहुणे फार खूष झाले. तरीही जिभांशिवाय दुसरा कोणताही पदार्थ ताटात नसल्यामुळे झांथस यास थोडेसे आश्चर्य वाटले व रागही आला. तो इसापला म्हणाला, ‘अरे, सर्वांत उत्तम असं पक्वान्न तयार करायला सांगितलं असता तू नुसत्या जिभेचेच निरनिराळे पदार्थ काय तयार करून ठेवलेस ?’ त्यावर इसापने उत्तर दिले, ‘जिभेपेक्षा चांगला असा दुसरा पदार्थ आहे का?’विद्या, तत्त्वज्ञान यांचा उगम जिभेपासून झाला आहे. व्याख्यान, अभिनंदन, लग्न, व्यापार इत्यादी मोठमोठ्या घडामोडी, प्रतिज्ञा या सर्वांचे मुख्य साधन जीभच होय, तिची बरोबरी करणारा दुसरा पदार्थ नाही.’
इसापचे हे समयसूचक भाषण लोकांना इतके आवडले की, त्यांनी त्याची फारच तारीफ केली. त्यावेळी झांथस पाहूण्यास म्हणाला, ‘अहो, आजच्याप्रमाणे उद्यासुद्धा रात्री तुम्ही माझ्याकडे जेवावयास यावं, अशी माझी विनंती आहे.’ मग तो इसापकडे पाहून म्हणाला, ‘अरे, आज जसे तू सर्वात उत्तम पक्वान्न तयार केलेस, तसे उद्या तुझ्या मते जे सर्वात वाईट पक्वान्न असेल ते तयार कर.’
दुसरे दिवशी सर्वजण जेवायला बसले असता आदल्या दिवशीचेच सर्व पदार्थ जेवणात होते. तेच पदार्थ पाहून पाहुण्यास व झांथस यांना फार आश्चर्य वाटले. मग झांथस इसापला रागाने म्हणाला, ‘अरे, काल जे पदार्थ चांगले होते तेच आज सर्वात वाईट कसे काय झाले?’ त्यावर इसाप उत्तरला, ‘जिभांपेक्षा वाईट असा दुसरा कोणता पदार्थ आहे ? जगात तितकी म्हणून नीचपणाची कृत्ये होतात, त्या सर्वांच्या मुळाशी जीभच कारणीभूत असते. बंड, मारामारी, लबाड्या नि अन्याय यांच्या संबंधाच्या गुप्त बोलाचाली जिभेनेच होतात. त्याचे इशारेही जिभेनेच दिले जातात. मोठमोठी राज्यं, प्रचंड नगरं इतकं नव्हे तर फार दिवसांचे मित्रत्वाचे संबंधसुद्धा जिभेमुळेच नाश पावतात.’ इसापचे हे चातुर्याचे बोलणे ऐकून लोक अगदी चकित झाले.
तात्पर्य: कोणत्याही वस्तूकडे निरनिराळ्या दृष्टीने पाहिले असता ती निरनिराळ्या प्रकारची दिसू लागते. त्याचप्रमाणे कोणत्याही वस्तूचा उपयोग जसा चांगल्या कामास होतो तसाच वाईट कामातही करता येतो.
पावसाचा थेंब | Pavsacha Themb Marathi katha
![]() |
| Pavsacha Themb Marathi katha |
ढगातून गळून पडलेल्या एका पावसाच्या थेंबाने आपल्या नशीबाविषयी जोरात कुरकुर केली. तो म्हणाला, ‘माझं जीवन किती निरुपयोगी आहे. आता माझा अंत होणार ! मी कोणालाही माहीत नाही, मी काही केलं नाही. मला आकाशातून हाकलून दिलं आहे. मी मुळी जन्मालाच आलो नसतो तर बरं झालं असतं ?’
तो थेंब नशिबाने एका शिंपल्यात पडला व लगेच ते शिंपले मिटले. पुढे कित्येक वर्षांनी त्या शिंपल्यातून एक अति मौल्यवान मोती निघाला व पावसाच्या थेंबाचा बादशहाच्या मुकुटात शोभणारा मोती बनला.
तात्पर्य: हलक्या कुळात जन्म घेतलेला माणूस स्वतःच्या तेजाने मोठेपणा मिळवतो.
रानटी व गावठी हंस | Ranati vs Gavthi hans Marathi Katha
![]() |
| Ranati vs Gavthi hans Marathi Katha |
एका कुंपणात काही हंस पाळले होते. त्यापैकी दोन हंस एके दिवशी कुंपणाच्या फटीतून बाहेर पडले व जवळच एक ओढा होता त्यातून पोहत पोहत एका दलदलीच्या जागी जाऊन पोहोचले. तेथे त्यांना चांगले खाद्य मिळू लागले म्हणून त्यांनी तेथे कायम राहावयाचे ठरविले. जवळच्या रानटी हंसाचा एक कळप वरचेवर तेथे येऊन बसत असे.
त्या कळपातील हंसांना या गावठी हंसांशी मैत्री करण्यास पाहिल्याने संकोच वाटला. पण कालांतराने त्यांचा इतका परिचय झाला की, ते त्यांच्याशी अगदी मोकळेपणाने वागू लागले.
एके दिवशी त्या हंसाचे आवाज ऐकून एक कोल्हा लपत छपत तेथे आला व तो त्यांच्यावर झडप घालणार तोच त्याची चाहूल ऐकून सगळे रानटी हंस ओरडत आकाशात उडून गेले.
ते दोघे गावठी हंस मात्र तेथेच राहिले. गावात असताना त्यांचा मालक त्यांचे रक्षण करीत असे. त्यामुळे त्यांना उडण्याची किंवा स्वतःचे रक्षण करण्याची सवय नव्हती. त्यामुळे ते दोघेही त्या कोल्ह्याच्या भक्ष्यस्थानी पडले.
तात्पर्य: जेथे आपले रक्षण करण्यास आपण समर्थ नाही तेथे जाउन राहणे मूर्खपणा होय.
Please note: मित्रांनो तुम्हाला या Moral stories in Marathi आवडल्या असतील तर खाली कंमेंट करून नक्की सांगा.
Note: मित्रांनो या small small story in Marathi तुमच्या मित्रांसोबत शेअर नक्की करा.
Also Read,
Birthday wishes for sister in Marathi










































